आयपीएलमध्ये विश्रांती घेत नाही, मग भारताच्या सामन्यांमध्ये असे का करता?; सुनील गावस्करांनी उपस्थित केला प्रश्न

IPL च्या या मोसमानंतर टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू सतत विश्रांती घेत आहेत. यामुळे सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत (IND vs WI) विश्रांती घेण्याच्या निर्णयाबद्दल फटकारले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वारंवार विश्रांतीची मागणी केली आहे त्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. गावस्कर यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खेळाडूंनी विश्रांती घेणे मला मान्य नाही. तुम्ही भारतासाठी खेळत आहात. तुम्ही आयपीएल दरम्यान विश्रांती घेत नाही, परंतु भारतासाठी खेळताना विश्रांती घेता. मला ते मान्य नाही. तुम्हाला भारतासाठी खेळावे लागेल. विश्रांतीबद्दल बोलू नका. असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.
सुनील गावस्कर म्हणाले, “मला प्रामाणिकपणे वाटते की बीसीसीआयने विश्रांती देण्याच्या संकल्पनेकडे पाहणे आवश्यक आहे. सर्व A ग्रेड क्रिकेटपटूंना खूप चांगले करार मिळाले आहेत. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी मोबदला मिळतो. कोणत्याही कंपनीच्या सीईओ, किंवा एमडीला इतके दिवस विश्रांती मिळते का? मला वाटतं भारतीय क्रिकेटला अधिक व्यावसायिक बनवायचे असेल तर एक रेषा काढावी लागेल. जर तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल, तर तुमच्या करारात डिमोशन असणे आवश्यक आहे. मग तुम्ही विश्रांती घेऊ शकता कारण तुम्हाला खेळायचे नाही, पण मला भारतीय संघासाठी खेळायचे नाही असे कोणी कसे म्हणू शकते? म्हणूनच मी या संकल्पनेशी सहमत नाही.