हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही – मोहन भागवत
ग्वाल्हेर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत देशातील हिंदूंच्या लोकसंख्येबाबत एक मोठं विधान केलं आहे. ग्वाल्हेरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना मोहन भागवत म्हणाले की हिंदूंची संख्या आणि ताकद दोन्ही कमी होत आहे.
हिंदूं धर्मातीलची लोकांची संख्या आणि ताकद कमी होत आहे
या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, तुम्हाला दिसेल की हिंदूंची संख्या आणि ताकद कमी झाली आहे किंवा हिंदुत्वाची भावना कमी झाली आहे. हिंदूंना राहायचे असेल तर भारत ‘अखंड’ व्हायला हवा. हिंदू आणि भारत वेगळे असू शकत नाहीत. भारताला जर भारत राहायचे असेल तर भारताला हिंदूच राहावे लागेल, असे त्यांनी यावेळी ठणकावून सां गितले.
हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही
पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही. हिंदूंची शक्ती कमी असेल तर भारत कमकुवत होईल. हिंदूंना देशापासून वेगळे केले तर आपला कोणताच इतिहास राहणार नाही. या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह संघाचे अनेक बडे नेते आणि राज्यातील मोठे नेतेही उपस्थित होते.
मोहन भागवत यांनी हिंदूंबद्दल असे विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 25 नोव्हेंबला नोएडामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, फाळणीच्या वेळी भारताला मोठा धक्का बसला होता. जो विसरता येत नाही. भारताची विचारधारा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. स्वतःला योग्य आणि इतरांना चुकीचे समजणारी ही विचारधारा नाही. तथापि, इस्लामिक आक्रमकांची विचारसरणी इतरांना चुकीची आणि स्वतःला बरोबर पाहण्याचीच होती. ब्रिटिशांची विचारसरणीही तशीच होती. आणि हेच भूतकाळातील संघर्षाचे मुख्य कारण होते. असंही ते म्हणाले.
सरसंघचालक भागवत यांनी या कार्यक्रमात इशारा देताना म्हटले होते की, हा 1947 चा भारत नसून 2021 चा भारत आहे. फाळणी एकदा झाली, आता पुन्हा होणार नाही. जे या भारत देशाचे तुकडे करण्याचा विचार करत आहेत त्यांचा स्वतःचाच नाश होईल. असंही ते म्हणाले होते.