Cyclone Mandous: येत्या 48 तासांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

WhatsApp Group

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मांडूस चक्रीवादळामुळे येत्या 48 तासांत महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी ही माहिती दिली. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासांनंतर किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आर्द्रता निर्माण होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. मांडूस या चक्रीवादळाचे नाव ‘मान-दस’ या अरबी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ खजिना असा आहे. हे नाव संयुक्त अरब अमिरातीने निवडले होते.

भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मांडूसमुळे तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत असून मध्यरात्रीपर्यंत ते किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शनिवारी चेन्नई, वेल्लोर, विल्लुपुरम, कुड्डालोर, रानीपेट, तिरुवल्लूर, चेंगलपट्टू आणि कांचीपुरममधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तामिळनाडूराज्य पोलिसांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्यासाठी 16000 पोलीस कर्मचारी आणि 1500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय तामिळनाडू राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 40 सदस्यीय टीम आणि 12 जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाची टीम स्टँडबायवर ठेवण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे, ग्रेटर चेन्नई पोलिसांनी लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे.