
औरंगाबाद – मनासारखी बायको मिळाली नाही, त्यात तिच्या अनेक सवयी पटत नसल्यामुळे नाराज राहणाऱ्या औरंगाबादमधील नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणानं व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असं स्टेटस् ठेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे समोर आली आहे.
अजय समाधान साबळे (25) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाच नाव आहे. तर बायकोला साडी नेसता येत नसल्याचा उल्लेख सुध्दा अजयने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजनगर भागात आई-वडिलांनासोबत राहणारा अजय प्लंम्बरच काम करून घर चालवत होता. दरम्यान पाच महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या मोबाईलवर ‘आय क्वीट’ असा स्टेटस् ठेवला. त्यामुळे हे स्टेट्स पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला.
तो त्याच्या खोलीमध्ये गेला असता अजयने गळफास घेतल्याचं त्याला दिसून आलं. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अजयला रुग्णालयात हलवले,पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.