छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना, शिक्षकाने विद्यार्थिनीचे वर्षभर केले लैंगिक शोषण

WhatsApp Group

शिक्षक हा गुरू असतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये गुरू-शिष्याचे नाते असते. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली. विद्यापीठातील एका विभागातील प्राध्यापकानेच विद्यार्थिनीचे वर्षभर लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे या प्रकाराला प्राध्यापकाच्या पत्नीचीही संमती होती. प्राध्यापकाला दोन मुली असूनही त्याने हे घृणास्पद कृत्य केले आहे.

याप्रकरणी मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अशोक गुरप्पा बंडगर व त्याच्या पत्नीविरुद्ध (रा. विद्युत कॉलनी, बेगमपुरा) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार ती २०१९ ते २०२१ दरम्यान शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. यावेळी ‘सर्व्हिस कोर्स’ करण्यासाठी तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्य विभागात प्रवेश मिळवला.

यावेळी अशोक बंडगर हा ऑनलाईन क्लासेस घेत होता. तिथे तिची अशोक बंडगरसोबत ओळख झाली. त्याने ओळख वाढवत ‘नाट्य विभागात पदवीसाठी दोन जागा खाली असून तू प्रवेश घे, तुला मी प्रवेश मिळून देतो’, असे आश्वासन तिला दिले. या अभ्यासक्रमासाठी पात्र नसतानाही त्याने तिला प्रवेश मिळवून दिला.त्यानंतर ‘चित्रपटात तू काम करू शकतेस,’ असे सांगत त्याने तिचा विश्वास संपादन केला. विद्यापीठात प्रवेश मिळवून दिल्यानंतर तिच्या राहण्याची व्यवस्था नव्हती, हे कळल्यानंतर ‘माझ्या घरी रहा, तू माझ्या मुलीसाखी आहेस’, असे म्हणत अशोक बंडगरने तिचा विश्वास संपादन केला.

या विश्वासावर ती ११ फेब्रुवारी २०२२ पासून त्याच्या घरी राहू लागली. काही दिवसांनी तिच्याशी तो (अशोक बंडगर) जवळीक निर्माण करू लागला. छेडछाड, शिवीगाळ, धमकी देत तो शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. जुलै २०२२ मध्ये ती गाढ झोपेत असताना त्याने बळजबरी करीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, या घटनेसंदर्भात पीडित विद्यार्थिनीने बंडगरच्या पत्नीला सांगितले; परंतु तिनेही कसलाही विरोध न करता उलट ‘हे मला मान्य असून तुझ्यापासून आम्हाला मुलगा हवाय, म्हणून ते तसे तुझ्यासोबत करत आहेत’, असे सांगितले.यानंतरही ३१ जानेवारी २०२३ ला पत्नीने तिला पतीच्या बेडरूमध्ये पाठविले. त्यावेळी संशयिताने तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले. अश्लील फोटोंद्वारे तुझी बदनामी करू, असे सांगत तिला वारंवार आपल्या पतीशी संबंध ठेवण्यास पत्नी सांगत असे. या सगळ्या प्रकारामुळे घाबरत ती नाइलाजाने संशयितासोबत संबंध ठेवू लागली.

वर्षभराच्या या प्रकारानंतर ‘तू माझ्याशी लग्न कर’ अशी गळ त्याने पीडितेला घातली; परंतु परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थिनी घरी गेली. तरीही तो तिला वारंवार फोन करून त्रास देत असे. पीडितेने हा प्रकार घरी सांगितल्यावर संशयित तिच्या वडिलांनाही धमकी देऊ लागला.अखेर पीडितेने महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार बेगमपुरा पोलिसांनी संशयित अशोक बंडगर आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल बोडखे करत आहेत.