
नवी दिल्ली – कॉलेज किंवा शाळेमध्ये अभ्यास केला नाही तर विद्यार्थी कॉपी करण्याचा चुकीचा पर्याय निवडतात. कॉपी करण्यासाठी जगभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात. कधी एखाद्या परीक्षेसाठी तर कधी सहज नोकरी मिळवण्यासाठी याचा कॉपीचा आधार घेतला जातो. मात्र यासाठी काही लोक अगदी तर हद्द पार करतात.
मध्य प्रदेशच्या इंदूरमधून अशीच एक अजब घटना समोर आली आहे, जी सर्वांनाच हैराण करणारी आहे. कॉपी करण्यासाठी येथील एका तरुणाने आपल्या जीवाचीही पर्वा न करता जीवघेणा प्रयोग केला आहे मात्र शेवटी तो पकडला गेला.ही घटना मध्यप्रदेशच्या इंदूर येथील एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये घडली आहे. यात एमबीबीएसच्या जुन्या बॅचचे दोन विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले.
परीक्षा देताना दोघांच्या अजब हालचाली पाहून त्यांच्यावर संशय आला. त्यांचा तपास केला असता दोघांकडेही मोबाईल फोन आढळले. मात्र हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका विद्यार्थ्याने कॉपी करण्यासाठी मायक्रो ब्लूट्यूथ डिवाईस सर्जरी करून आपल्या कानात फीट केल्याचे समोर आलं. या तरुणाचे म्हणणं आहे, की लोकांना हे डिवाईस बाहेरून दिसू नये, यासाठी त्याने असं केलं.
या घटनेची माहिती समजल्यावर फ्लाईंग स्क्वायडने परीक्षा केंद्रात छापा मारला. यावेळी टीमला एका मोबाईल सापडला. मोबाईल एका ब्लूट्यूथ डिवाईसला कनेक्ट होता. बराच तपास केल्यानंतरही ब्लूटूथ डिवाईस टीमच्या हाती लागले नाही. यानंतर विद्यार्थ्याकडे चौकशी सुरू केली. काही वेळानंतर या फायनल ईअरच्या विद्यार्थ्याने स्वतःच खुलासा केला की त्याने मायक्रो ब्लूट्यूथ डिवाईस सर्जरी करून आपल्या कानामध्ये फीट केलं आहे. विद्यार्थ्याने याच्या परिणामाचा विचारही न करता हे जीवघेणे पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने हे यासाठी केले कारण त्याच्याकडे ही परीक्षा देण्याची शेवटची संधी होती. विद्यार्थी मागील ११ वर्षांपासून तो ही परीक्षा देत होता. मात्र तो पास होत नव्हता. त्याच्याकडे ही अखेरची संधी होती. त्यामुळे त्याने हा पर्याय शोधला. सध्या या दोन्ही विद्यार्थ्यांविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. एमजीएम कॉलेजला नोटीस पाठवण्यात आली आहे. कॉलेजच्या डीनने सांगितले की या घटनेची संपूर्ण माहिती डीएवीवीला दिली गेली असून विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल.