कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ
नवी दिल्ली: कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. प्रतिवर्षी देशाच्या राजधानीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ संचलनाचे आयोजन करण्यात येते. या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा समावेश असतो.
सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी चित्ररथ पथ संचलनात 26 राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश यांना ‘विकसित भारत’ व ‘भारत लोकशाहीची जननी’ या दोन संकल्पनांवर आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून राज्याने, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त, या विषयास अनुसरून ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर संरक्षण मंत्रालयास चित्ररथाचे सादरीकरण करण्यात आले होते.
यावर्षी, भारत देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये 30 चित्ररथ प्रर्दशित होणार आहेत. यामध्ये 16 राज्य, 07 केंद्रशासित प्रदेश व उर्वरित विविध केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश असणार आहे. देशभरातून एकूण 30 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती, पैकी विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.
हेही वाचा – IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा झटका, विराट कोहली कसोटी संघातून बाहेर
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याच्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडत असते.
दरवर्षी कर्तव्य पथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे.
पथसंचलनात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या चमूच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. रयतेचा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणाऱ्या ‘धन्य शिवराय… धन्य महाराष्ट्र !’ गीताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.
असा असणार यंदाचा चित्ररथ…
यंदाच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंत दाखवण्यात आली आहे. चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा फिरवतांना दिसतात व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसत आहेत. त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवण्यात आला आहे. या दरबारात काही महिला आपल्या प्रश्नांसाठी उपस्थित असल्याचे दिसत आहेत. तर मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. तर शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे.