
महागाईने सामान्यांची कष्टाची कमाई गिळंकृत करण्यास सुरुवात केल्यामुळे दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. या आधीची कपात दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाली होती. पुन्हा एप्रिलमध्ये दर वाढले होते. मात्र, इतर राज्यांनी धडाधड कर कमी केले तरी आपल्या राज्य सरकारने आडमुठेपणा दाखवत दर कपात केली नव्हती. अखेर केंद्राच्या दुसऱ्या दरकपातीनंतर राज्य सरकारने किंचित का होईना पण व्हॅट कमी केला आहे.
यामुळे नागरिकांना आज सोमवारी आणखी दिलासा मिळेल असं वाटत होतं. परंतू तसे झाले नाही. कालच्याच केंद्र सरकारने कमी केलेल्या दराने आज राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल विक्री करण्यात येत आहे. म्हणजेच नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
राज्यात पेट्रोलवरील कर २ रुपये ८ पैसे, तर डिझेलवरील कर १ रुपया ४४ पैशांनी कमी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. केरळ, राजस्थान, ओडिशा या राज्यांनीही पेट्रोल – डिझेलवरील वॅटमध्ये कपात केली. मात्र दुसरीकडे भाजपशासित १२ पेक्षा अधिक राज्यांनी करकपात केलेली नाही.