IPL 2023: चेन्नईच्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतली IPLमधून निवृत्ती, CSK ने लगेच दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू ड्वेन ब्राव्होने इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या आधी स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सीएसकेने मोठी जबाबदारी सोपवली आहे. चेन्नईने ब्राव्होला संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवले आहे. याबाबत फ्रँचायझीने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. फ्रँचायझीने ट्विटद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली. वैयक्तिक कारणांमुळे लक्ष्मीपती बालाजी एक वर्षाचा ब्रेक घेत असल्याची माहिती टीमने दिली.
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रापासून ब्राव्हो या स्पर्धेचा भाग आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला सामना मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. ब्राव्होने पदार्पणाच्या सामन्यात 16 चेंडूंचा सामना करत 24 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना मे 2022 मध्ये मुंबईविरुद्ध खेळला होता.
The streets will never forget…💛#ChampionForever 🦁 pic.twitter.com/am3oTQu7Ce
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 2, 2022
ब्राव्होच्या एकूण आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 161 सामन्यांमध्ये 1560 धावा केल्या आहेत. यादरम्यान ब्राव्होने 5 अर्धशतके झळकावली. त्याने या स्पर्धेत 183 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 22 धावांत 4 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. चेन्नई आणि मुंबई व्यतिरिक्त ब्राव्हो या स्पर्धेत गुजरात लायन्सकडूनही खेळला आहे. वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्राव्होची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दही नेत्रदीपक राहिली आहे. त्याने 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1255 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 66 आहे. त्याने या फॉरमॅटच्या 77 डावांमध्ये 78 विकेट्स घेतल्या आहेत.