टीम इंडियाच्या एका स्टार फास्ट बॉलरसोबत लाखोंची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विशेष म्हणजे ज्याने क्रिकेटरची फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून त्याचाच माजी व्यवस्थापक आणि मित्र होता. आम्ही बोलत आहोत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवबद्दल. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा मित्र आणि माजी व्यवस्थापकाने उमेशसोबत 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नागपुरात उमेश यादव याच्या नावाने जमीन खरेदी करताना ही फसवणूक झाली. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणाची माहिती दिली.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उमेश यादव याच्या तक्रारीवरून शैलेश ठाकरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे (वय 36) हा कोराडी येथील रहिवासी असून उमेश यादव याचा मित्रही आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. उमेश यादवची भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याने 15 जुलै 2014 रोजी आपला मित्र ठाकरे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. ठाकरे हळूहळू उमेश यादवचे विश्वासू बनले आणि उमेश यादवचे सर्व आर्थिक व्यवहार ते पाहू लागले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने क्रिकेटपटूची बँक खाती, आयकर आणि इतर आर्थिक बाबी पाहिल्या.
उमेशला नागपुरात जमीन विकत घ्यायची होती, असे त्याने ठाकरे यांना सांगितले. ठाकरे यांनी ओसाड भागात एक प्लॉट दाखवला आणि हा प्लॉट 44 लाख रुपयाला मिळेल असं सांगितलं. मेशने ठाकरे यांच्या खात्यात रक्कमही जमा केली. मात्र ठाकरे यांनी हा प्लॉट आपल्या नावावर केला. फसवणूक झाल्याची माहिती उमेश यादवला समजताच त्याने ठाकरे यांना प्लॉट आपल्या नावावर करण्याची मागणी केली मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला. ही रक्कम उमेश यादव यांना परत करण्यासही ठाकरे याने नकार दिला. उमेश यादवने कोराडी येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 406 आणि 420 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
उमेश यादवबद्दल बोलायचे झाले तर, डिसेंबरमध्ये तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत शेवटचा खेळताना दिसला होता. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये त्याने टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला होता. त्याच वेळी, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये बराच काळ बाहेर आहे. त्याने 24 ऑक्टोबर 2018 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. याशिवाय, आयपीएल 2022 मध्ये, त्याने कोलकाता नाइट रायडर्ससाठी अप्रतिम कामगिरी केली.