
मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ (Ashi Hi Banvabanavi) या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे सदाबहार गीत पुन्हा नवीन रूप घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होऊन 34 वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. आजही हे गाणं तेवढच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं.
तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं ‘टकाटक 2’मध्ये नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ईराणी-जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श ‘हृदयी वसंत फुलताना…’ (Hrudayi Vasant Fultana) या गाण्याला लाभला आहे. नुकताच ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये ‘हृदयी वसंत फुलताना…’ हे गाणं नव्या रूपात लाँच करण्यात आलं.
निर्मात्यांनी अगोदर 90 सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते, परंतु संगीतप्रेमींच्या मागणीनुसार निर्मात्यांनी संपूर्ण गाणे आजच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.