पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड-सांगली महामार्गावरील सोनवडी गावच्या हद्दीत आज दुपारी भीषणअपघात घडला आहे. पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बहीण-भावचा जागीच मृत्यू झाला आहे. अनुष्का गणेश शिंदे, आदित्य गणेश शिंदे असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे अनुष्का आणि आदित्य दोघेही आपल्या स्कुटीवरून शाळेत चालले होते. मनमाड-सांगली महामार्गावर सोनवडी गावजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप व्हॅनने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुटीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कुटीचा पुर्णपणे चुराडा झाला आहे.
या अपघातात अनुष्का गणेश शिंदे, आदित्य गणेश शिंदे या बहिण भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअपचा ड्रायव्हर पळून गेला. बहिण भावांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांत पिकअप व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार वाहनचालकाचा शोध घेत आहे.
मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला
दरम्यान, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत असतांना नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झालेला होता. यावेळी छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवत तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.