कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणार शिंदे सरकार

WhatsApp Group

मुंबई : कोरोना (Covid-19) महामारीत आपले पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिंदे सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगितले की, कोविड-19 महामारीमुळे ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले पालक दोघेही गमावले आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील विविध शासकीय महाविद्यालयात 931 पदवीधर आणि 228 पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीच्या काळात आपले दोन्ही पालक गमावले आहेत. त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क सरकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला दोन कोटी रुपयांहून अधिक बोजा पडणार असल्याचे सांगून राज्यमंत्री म्हणाले की, आता राज्य सरकारला दरवर्षी असा निर्णय घेण्याची गरज भासणार नाही.

राज्यात नवे सरकार आल्यापासून त्यांनी जनहिताचे एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. तरुण आणि विद्यार्थ्यांच्या हिताची नुकतीच ही दुसरी मोठी घोषणा आहे. याआधी शिंदे सरकारने दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाला अनेक विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.