अंबाजोगाई – बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. हळदी समारंभात (haldi ceremony ) केलेले कृत्य एका नवरदेवाला चांगलंच महागात पडले आहे. संबंधित कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहित तरुणाला अशाप्रकारे तुरुंगाची हवा खावी लागल्याने दोन्हीकडील कुटुंबावर आता नामुष्की ओढावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये बालाची भास्कर चाटे या तरुणाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला होता. या लग्नामध्ये शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. अगदी आनंदात आणि थाटामाटात हा हळदी समारंभ पार पाडण्यात आला. मात्र हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडेदहाच्या दरम्यान बालाजीने आपल्या मित्रांसोबत बेधुंद होऊन डान्स केला.
पण थोड्याच वेळात आनंदाच्या भरात बालाजीच्या काही मित्रांनी स्वत: जवळील बंदूक काढून हवेत गोळीबार (Gun firing) केला. यावेळी बालाजीने देखील हातामध्ये बंदूक घेत हवेत फायरींग केली. दरम्यान उपस्थित असणाऱ्या एकाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नवरदेव बालाजी चाटेसह, शेख बाबा आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.