
मुंबई – गेल्या दोन वर्षांमध्ये कधी ऑनलाइन कधी ऑफलाइन भरणारे वर्ग आता पूर्णवेळ १०० टक्के क्षमतेने Schools Reopening शाळांच्या बाकांवर भरतील. मुंबईत कोरोनासाथ नियंत्रणात आल्यामुळे येत्या २ मार्चपासून शहरातील सर्व मंडळांच्या शाळा आणि ज्युनिअर कॉलेज पूर्ण वेळ आणि क्षमतेने सुरू होणार आहेत.
त्यामुळे आतापर्यंत ५० टक्के प्रत्यक्ष आणि ५० टक्के ऑनलाइन चालणाऱ्या सर्व शाळा आता प्रत्यक्ष भरतील. मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी शुक्रवारी याबाबत आदेश जारी केले आहेत. मार्चपासून शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असेल असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुंबईत कोरोना संसर्गामुळे शाळा नियमितपणे आणि प्रत्यक्ष सुरू होण्यात वारंवार व्यत्यय येत आले आहे. अखेरीस कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मुंबईतील पालिकेसह अन्य सर्व मंडळाच्या पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शाळा व ज्युनिअर कॉलेजे मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात विशेष म्हणजे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे वर्ग, मैदानी खेळ, शाळेच्या विविध उपक्रमांसह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने शाळा आता सुरू होणार आहेत.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी आयुक्त चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी, कोरोना नियंत्रणात आला तरीही शाळा सुरू करताना सर्वतोपरी काळजी घेणे, कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.