उपेक्षित, वंचितांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

WhatsApp Group

अहमदनगर : तृतीयपंथीय, उपेक्षित व वंचितांना  समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार आहे. समाज, शासन व न्यायव्यवस्था ही आता समाजाच्या समतेसाठी एक विचाराने काम करत आहे‌, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

‘स्नेहालय’ संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १२ ते १५ ऑगस्ट २०२२ कालावधीत अहमदनगर औद्योगिक वसाहती मधील ‘स्नेहालय’ पुनर्वसन संकुलात ‘युवा प्रेरणा शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे औपचारिक उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘स्नेहालय’चे संस्थापक डॉ.गिरीष कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, उपाध्यक्ष अरूण शेठ, सेवानिवृत्त मेजर जनरल जीबन कनाई दास, मामुन अख्तर, मनीषा लढ्ढा व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, भारताने मागील ७५ वर्षात खूप प्रगती केली आहे‌. विशेषतः मागील ७ वर्षात प्रत्येकाच्या घरात वीज, शौचालय उपलब्ध झाले आहेत. ३३ कोटी लोकांचे स्वतःचे बॅंक खाते सुरू झाले आहेत. रस्ते चागले बनत आहेत. देशाची प्रगती होत आहे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी सैनिकांनी त्याग व बलिदान दिले आहे‌. स्वामी विवेकानंदांनी तरूणांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली. समाजातील सर्व घटकांना पुढे आणण्यासाठी युवक चांगले काम करू शकतात. देशाला पुढे आणण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशा शब्दात राज्यपालांनी युवकांना मार्गदर्शन केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. इथं आईला ‘माऊली’ म्हणतात. ‘माऊली शब्दात ममत्व, प्रेमाचा भाव आहे. समाजाला एकत्र जोडण्यासाठी प्रेम व स्नेहभाव वृद्धिंगत करणे गरजेचे आहे. आपला शेजारी संपन्न व सुसंस्कारित असेल तर आपल्या घरात ही शांतता नांदते‌. बांग्लादेश व नेपाळसारखी सुख, संपन्न राष्ट्र आपले शेजारी आहेत. बांग्लादेशहून आलेले सेवानिवृत्त मेजर जनरल जीवन कनाई दास म्हणाले, भारत-बांगलादेश मैत्रीच्या माध्यमातून दोन्ही देशांत शांतता व स्थैर्य प्रस्थापित झाले आहे. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था प्रगतीकडे वाटचाल करत आहे.

यावेळी राज्‍यापालांच्‍या हस्‍ते स्‍नेहालयात सामाजिक काम करणा-या व्‍यक्‍तींचा प्रातिनिधिक सत्‍कार करण्‍यात आला. ‘स्नेहालय’च्या उपेक्षित, वंचितांसाठी असलेल्या कामाची प्रशंसा करुन राज्‍यपालांनी संस्‍थेला रूपये १० लाख मदत देत असल्याचे जाहीर केले. राज्यपालांच्या उत्साहपूर्ण संभाषणामुळे उपस्थित युवकांमध्ये चैतन्य संचारले होते. कार्यक्रमानंतर राज्यपालांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील वाटचालीतील ठळक घडोमोडींची नोंद घेणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात आले.