ठाणे : पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना काल मुंबई महानगरापासून जवळच असलेल्या मुरबाड या तालुक्यातील करवळे या गावी घडली आहे. तू भुताळ्या आहेस, जादूटोणा करतोस, करणी करतोस, त्यामुळे गावामध्ये आजारपण वाढत आहे. तू गोंधळाच्या ठिकाणी चल आणि पेटत्यां निखाऱ्यावर उभे राहून अग्निपरीक्षा दे, असे म्हणत लक्ष्मण बंडू भावार्थे (वय.60) यांना पहाटे अडीच वाजता त्यांच्या घरातून झोपेतून उठून नेऊन त्यांना विस्तवावर जबरदस्तीने उभे केले. यामुळे त्यांचे दोन्ही तळपाय जबरदस्त भाजले आहेत.
याबाबतची निनावी तक्रार आणि या घटनेचा व्हिडिओ अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांच्याकडे आला. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्याकडे या केसबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी ती तक्रार पाठवली. वंदना शिंदे यांनी पीडित वृद्धाच्या विधवा मुलीशी संपर्क साधून तिला धीर दिला. संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात असल्यामुळे ती तक्रार द्यायला धजावत नव्हती. परंतु अंनिस कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी तिला आधार देऊन पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितले. तसेच मुरबाड पोलीस स्टेशनला फोन करून सदर घटनेबाबत तक्रार नोंद करून घ्यावी अशी विनंती केली. त्यामुळे पोलिसांनी काल गावकऱ्यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदयानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, करवेळे या गावी लक्ष्मण बंडू भावार्थे हे आपली विधवा मुलगी सविता सुनील मोरे आणि नातू सागर यांच्यासह राहतात. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे शेजारी काथोड महादू भावार्थे हे त्यांच्याविषयी गावात जादूटोणा करणी करतात असा प्रचार सतत करत असल्यामुळे गाववाले येता जाता या कुटुंबाला टोमणे मारत असतात.
या रविवारी करवळे गावामध्ये भावार्थे घराण्याच्या कुलदैवताचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी लक्ष्मण भावार्थे हे आजारी असल्याने कुलदैवताच्या गोंधळाच्या कार्यक्रमाला न जाता घरीच आराम करत होते. रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले असताना पहाटे त्यांचा दरवाजावर लाथा मारुन दरवाजा उघडायला लावला. त्यावेळी आठ दहा गावकऱ्यांनी लक्ष्मण भावार्थे यांना उद्देशून ” तू गावामध्ये जादूटोणा करणी करतो, तू गोंधळाच्या ठिकाणी चल, तुला कुलदैवतासमोर अग्निपरीक्षा द्यावी लागेल, तू आला नाहीस तर तुला उचलून नेऊ” असे बोलून गावातील काठोड महादू भावार्थे, ज्ञानेश्वर काथोड भावार्थे, काळुराम भावार्थे, शिरीष भावार्थे, भूषण भावार्थे, परसु भावार्थे व इतर तीन चार लोकांनी लक्ष्मण भावार्थे यांना अंथरुणावरून उचलून नेऊन गोंधळाच्या ठिकाणी जळत्या निखाऱ्यावर उभे केले आणि म्हणाले की, “चल तू तुझा देव अंगात आणून दाखव, तू भुताटकी करतो हे कबूल कर” असे म्हणून त्यांना तीन चार लोकांनी जबरदस्तीने पकडून ठेवून जळत्या निखाऱ्यावर उभे केले. यावेळी त्यांच्या पाठीवर हातावर पायावर लाथा मारून ‘तुझ्या अंगात भुताटकी येते तू पेटत्या इंगळावर चालून दाखव’ असे म्हणून आसनगाव वरून आलेल्या मांत्रिकाने गोंधळाच्या ठिकाणी जळते निखारे आणून टाकले आणि त्यावर लक्ष्मण भावार्थे यांना जबरदस्तीने उभे केले. ते वेदनेने ओरडत असताना ही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना तीन-चार लोकांनी पकडून ठेवल्यामुळे त्यांना विस्तवावरून बाजूला होता येईना. यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना जबरी जखमा झाल्या आहेत.
या घटनेचा व्हिडिओ तेथील एका जागरूक गावकऱ्यांनी तयार करून तो अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांना पाठवला आणि त्या पीडित गरीब कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली.
पीडित लक्ष्मण बंडू भावार्थे यांची विधवा मुलगी सविता सुनील मोरे हिच्या शी अंनिस कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी संपर्क साधून तीला फिर्याद देण्यासाठी तयार केले. सविता मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये गावकरी काथोड भावार्थे, ज्ञानेश्वर भावार्थे काळुराम भावार्थे, शिरीष भावार्थे भूषण भावार्थे, परसू भावार्थे आणि गावातील तीन ते चार लोक यांचे विरोधात भा.दं.स. 452,323,324,341,143,147 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 च्या कलम ३ तीन नुसार गुन्हा (क्र.००६५) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुरबाड चे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर हे करत आहेत.