
मुंबई – राज्यात आगामी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसह भाजप, मनसेने जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेनं मुंबईच्या बीकेसी मैदानामध्ये मास्टर सभा घेतली.
शिवसेनेच्या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी पत्रकार परिषद घेवून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असंस्कृत भाषणाला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असं म्हणायला मला लाज वाटते, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असंस्कृत भाषणाला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं नारायण राणे म्हणाले. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असं म्हणायला मला लाज वाटते. आजपर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवायचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे शिवसेनेचे भाषण ऐकून वाईट वाटलं.
14 तारखेला फार मोठा गवगवा करून जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. देशभरातील जनतेने सभा किती भरली आणि खर्च किती केला, याचा अंदाज घेतला असावा, असे म्हणत नारायणे राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील काही ठळक मुद्दे
- कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे.
- शिवसेनेच्या हृदयात राम आहे की रावण ?
- हे रामही नाही आणि रावणही नाही.
- देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलतात, पण तुमचा चेहरा आरशात बघा.
- शिवसेनेकडे विकृत बुद्धीची लोकं आहेत.
- हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावं लागतं.
- राज्याचे मुख्यमंत्री काय आणि कुठल्या भाषेत बोलू शकतात, याचा अंदाज राज्यातील जनतेला आलाय.
- महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात किती लोकांच्या चुली पेटवल्या, किती लोकांना नोकऱ्या दिल्या ?
- मुंबई पालिकेत भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे. कुठे नसेल इतका भ्रष्टाचार मुंबई पालिकेत आहे.