
मागील काही दिवसांपासून देशात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी मास्क घालणे देखील बंधनकारक करण्यात आलं आहे.
अशातच गेल्या 24 तासांत देशभरात 2 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर यादरम्यान, 27 जणांचा मृत्युही झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशभरात कोरोनाचे 2 हजार 202 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची सक्रिय संख्या 17 हजार 317 इतकी झाली आहे.
दुसरीकडे 27 रुग्ण उपचारादरम्यान दगावल्याने मृतांची संख्या 5,24,241 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाची 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. दुसरीकडे कोरोनापासून बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 98.74 टक्के इतका आहे.