मुबंई – नवरा वयाने दुप्पट आणि पुढे शिकवणार की नाही या भितीमुळे एका आईने (mother) 15 वर्षाच्या मुलाला फुटपाथवर सोडून दिल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये (mumbai) घडली आहे. मुंबई पोलिसांनी (mumbai police) मोठ्या शिताफीने तपास करून या बाळाच्या आईचा शोध लावला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेच्या हद्दीत चौपाटीवर बस स्टॉपच्या आडोशाला एक अज्ञात व्यक्ती साधारण १५ दिवसांच्या नवजात बाळाला ठेवून गेल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तात्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा ढेकळे यांनी पोलीस पथकासह जाऊन त्या नवजात बाळाला कुशीत घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले.
तपासा दरम्यान सदर बाळाला ठेवणारी त्याची आई आणि तिच्यासोबत एक पुरुष सीसीटीव्हीमध्ये दिसत होता. हे दोघे चर्चगेट रेल्वे स्थानकावरुन येवून मरीन लाईन्स येथे जाताना दिसले. नंतर पुन्हा चर्चगेट स्टेशनला येवून दोघे दादर येथे उतरुन मध्य रेल्वच्या दिशेने गेले आणि तिथून ट्रेनमध्ये बसले आणि खडवली रेल्वे स्थानकावर उतरताना दिसले. पण पुढे ते दोघे कुठे गेले याचा पत्ता पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे आता वाळवंटातून सुई शोधण्यासारखे त्या बाळाच्या आईला पोलीस शोधत होते. बघता बघता त्यांना बाळाची आई आणि मामा यांचा शोथ लागला आणि पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली.
