मुंबईत 26 मशिदींचा मोठा निर्णय, लाऊडस्पीकरशिवाय होणार सकाळची अजान

WhatsApp Group

मुंबई – देशभरात सध्या लाऊडस्पीकरच्या अजानवरून वाद सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मगुरूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मशिदींमध्ये सकाळी लाऊडस्पीकर लावले जाणार नाहीत, असा निर्णय दक्षिण मुंबईतील धर्मगुरू आणि विश्वस्तांनी घेतला आहे.

मुंबईमधील मोहम्मद अली रोड, मदनपुरा, नागपाडा, मुस्लीमबहुल भागांसह 26 मशिदींच्या धर्मगुरूंनी सुन्नी बादी मशिदीत बैठक घेऊन एकमताने हा निर्णय घेतला आहे.

त्यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, लाऊडस्पीकरवरून सकाळची अजान वाचली जाणार नाही. यासोबतच सर्व मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यात येईल. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत अजान आणि लाऊडस्पीकरचा वापर केला जाणार नाही.

मुंबई पोलिसांनी बुधवारी सांगितले की, शहरातील 2,400 मंदिरांपैकी केवळ 24 मंदिरांनाच लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळाली आहे, तर एकूण 1,140 मशिदींपैकी 950 मशिदींना अधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, महानगरातील केवळ एक टक्के मंदिरांनी त्यांच्या आवारात लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेतली आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.