इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे विजेतेपद पाच वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2022 मध्ये सलग पाच सामने गमावल्यानंतर गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. आता रोहित शर्माच्या संघाचा सामना शनिवारी लोकेश राहुलच्या लखनौ सुपर जायंट्सशी होईल, जे पाच पैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.
पंजाब किंग्जविरुद्धच्या गेल्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजीची कामगिरी सरस होती. मयंक अग्रवाल आणि शिखर धवनची सलामीची भागीदारी तोडण्यासाठी संघाला बराच वेळ लागला असला तरी, जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील आक्रमणाने दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
दुसरीकडे, मुंबईची फलंदाजी पुन्हा एकदा संघाला विजयाची रेषा ओलांडण्यात अपयशी ठरली. युवा डेवाल्ड ब्रेविस आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला मोठे योगदान देता आले नाही. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.
दुसरीकडे, लखनौ संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यातही राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईप्रमाणेच लखनौसाठीही त्यांच्या कर्णधाराचा खराब फॉर्म ही मोठी समस्या आहे. IPL 2022 मध्ये राहुल बॅटने विशेष चमत्कार दाखवू शकला नाही.
क्विंटन डी कॉकचा उत्कृष्ट फॉर्म हा लखनौच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजीसाठी एकमेव आधार आहे. मात्र, दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांनी खालच्या फळीत अनेक सामना जिंकणाऱ्या खेळी खेळल्या आहेत. पण जेतेपदासाठी लखनौला काही मोजक्या खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून राहता येणार नाही.
मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, बेसिल थम्पी, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, मयंक मार्कंडेया, मुरुगन अश्विन , रिले मेरेडिथ, टायमल मिल्स, अर्शद खान, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, फॅबियन ऍलन, किरॉन पोलार्ड, संजय यादव, आर्यन जुयाल आणि इशान किशन.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ – लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, कृणाल पांड्या, एविन लुईस, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, काइल मायर्स, आवेश खान, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई, आयुष बडोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मयंक यादव, मोहसीन खान आणि करण शर्मा.