ठाणे: आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी आणि समाजासाठी काय दिले, हे जास्त महत्त्वाचे आहे. पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाही, तर ते सामाजिक बांधिलकीनेही तितकेच चांगले काम करते. सामाजिक बांधिलकीची शिकवण धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडून आपल्याला मिळाली. या शिकवणीनुसार मुख्यमंत्री म्हणून मी सामाजिक काम करीत आहे. राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच शासनाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
पुढारी वृत्तपत्राच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे आयोजित “पुढारी युथ आयकॉन 2024” या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, पुढारी वृत्तपत्राचे तुळसीदास भोईटे, विवेक गिरधारी, शशिकांत सावंत, आदी उपस्थित होते.
‘पुढारी’ वृत्तपत्राच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या “पुढारी youth icon 2024” या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नवोदित तरुणांना सन्मानित केले. यात उद्योग, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण अशा… pic.twitter.com/SHRjkQ3eqW
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 1, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. ही आपली शक्ती आहे. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. संपूर्ण जगभरात भारताला नावलौकिक मिळत आहे. आजच्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्यास आपला देश हा विकसित देश म्हणून ओळखला जाईल. त्या दिशेने केंद्र व राज्य शासनाचे काम सुरु आहे. चांगले काम करणाऱ्यांना योग्य वेळेत पाठीवर थाप मिळाल्यास त्यास अधिक ऊर्जा मिळते. ते अधिक चांगले काम करु शकतात. चांगले काम करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करणे, ही सुदृढ समाजाच्या दृष्टीने काळाची गरज आहे.
पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली “पुढारी” वृत्तपत्राची वाटचाल दमदारपणे सुरु आहे. चांगल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांना सन्मानित करण्याचे उत्तम कार्य पुढारी करते. करोना काळातही पुढारीने उत्कृष्ट कार्य केले. पुढारी चॅनलच्या माध्यमातून चांगले काम सुरु आहे. अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे, चांगल्या व्यक्तींच्या कामाचे कौतुक करणारे असे हे वृत्तपत्र आणि चॅनल आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव चांगला समाज घडण्यासाठी आवश्यक आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, केंद्रीय लघु उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्मिती होऊन लोकांना विविध प्रकारची कामेही मिळत आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, कौशल्य विकास, स्टार्टअप अशा विविध योजनांच्या माध्यमातून राज्य शासनही तरुणांना उद्योजक म्हणून घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्याचा सर्वांगीण विकास, सर्वसामान्य माणसाचा विकास हे ध्येय समोर ठेऊन “मेक इन इंडिया” चा ध्यास घेवून राज्य शासन काम करीत आहे. प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली देश आत्मनिर्भर होतोय. तरुणाईला योग्य दिशा दिली जात आहे. आपली अर्थव्यवस्था जगभरात आघाडीवर येण्यासाठी मार्गक्रमण करीत आहे. आपले महाराष्ट्र राज्य भारताचे “ग्रोथ इंजिन” आहे. “डीप क्लिन ड्राइव्ह” अभियानात पुढारी वृत्तपत्रानेही पुढाकार घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या युवांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यात प्रामुख्याने प्रशासनातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर ठाणे पुढारी आवृत्तीचे मुख्य प्रतिनिधी दिलीप शिंदे, रायगड आवृत्ती ब्युरो चीफ जयंत धुळप यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार दिलीप शिंदे यांनी मानले.