हेडफोन लावून चालणे पडले महागात, रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू

WhatsApp Group

जळगाव – कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्यामुळे रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असे या तरुणीचे नाव असून ती 20 वर्षांची होती. स्नेहल उजेनकर जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत होती. ती एका खासगी दुकानात कामाला होती.

काम आटोपून घरी जात असताना ती नेहमीच कानात हेडफोन घालून घराकडे जात असे. घराकडे जात असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती फेकली गेल्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला.

मृत्यूनंतर ही हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याने त्यामुळेच तिला रेल्वेचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.