मुंबई – मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन (Mumbai Local Train)मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, याच लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेवर ब्लेडने हल्ला (Blade attack on woman passenger) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईमधील चर्नी रोड रेल्वे स्थानकामध्ये (Charni Road railway station) ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. पीडित महिलेने वांद्रे रेल्वे स्थानकातून चर्चगेटला जाणारी लोकल रात्री 11.45 वाजता पकडली. पीडित महिला ही महिलांच्या डब्यातून प्रवास करत होती.
चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर येताच एक चैन स्नॅचरने महिलांच्या डब्यामध्ये प्रवेश केला. पीडित महिलेच्या गळ्यातील चैन पाहून त्याने ती खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पीडित महिलेवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पीडित महिला जखमी झाली आहे.
या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांच्या डब्यात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली असून आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या घटनांची वारंवार नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या घटना वाढतानाही दिसत आहेत. जवळपास तीन आठवड्यांपूर्वी नायगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीवर चोरीचे 10 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी बोरिवली जीआरपीकडेच पाच गुन्हे नोंद असल्याचेही समोर आलं होतं.