वनडे क्रिकेटच्या इतिहासात 5 जानेवारीचा दिवस खूप खास आहे. 52 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 5 जानेवारी 1971 रोजी वनडे क्रिकेट इतिहासातील पहिला सामना खेळला गेला होता. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये हा सामना खेळला गेला. तेव्हा कसोटी क्रिकेटच्या 96 वर्षानंतर क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये काही बदल होईल असे क्वचितच कुणाला वाटले असेल. या खेळाच्या दिशेने मैदानाबाहेरील प्रेक्षकांमध्ये नवा उत्साह आणि नवी ऊर्जा पाहायला मिळेल, याची खात्रीही कुणाला नव्हती. या लेखात आम्ही हे देखील सांगणार आहोत की वनडे सामना का खेळला गेला आणि त्याचे कारण काय होते?
मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पाहुण्या संघाची पहिली विकेट 21 धावांवर पडली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला ज्योफ बॉयकॉट 8 धावा करून बाद झाला. सलामीवीर जॉन एडरिच वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. एडरिचने 82 धावा केल्या. इंग्लंडच्या स्कोअरकार्डवर नजर टाकली तर कीथ प्लेचर 24, अॅलन नॉट 24 आणि बेसिल डी’ओलिव्हिया याने 17 धावा केल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ 39.4 षटकांत 190 धावांत ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले मॅलेट आणि कीथ स्टॅकपोलने 3-3 बळी घेतले. तर ग्रॅहम मॅकेन्झीने 2 बळी घेतले.
ऑस्ट्रेलिया 5 विकेट्सने जिंकला होता सामना
विजयासाठी 191 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. कांगारू संघाची पहिली विकेट 19 धावांवर पडली. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला सलामीवीर किथ स्टॅकपोल 13 धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इयान चॅपेलने 60 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय डग वॉल्टर्सने 41 धावा केल्या. ग्रेग चॅपेल 22 आणि रॉडनी मार्शने 10 धावा करून नाबाद राहिले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने इतिहासातील पहिली वनडे 5 विकेटने जिंकली. इंग्लंडकडून रे इलिंगवर्थने सर्वाधिक 3 बळी घेतले. या सामन्यात 82 धावांची खेळी करणारा इंग्लंडचा फलंदाज जॉन एडरिच याला सामनावीराचा किताब देण्यात आला. अशाप्रकारे, एकदिवसीय इतिहासात सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा एडरिच जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला.
वनडे सामना का खेळवला गेला?
वनडे सामने खेळण्याची एक अतिशय मनोरंजक कथा आहे. 1970-71 मध्ये इंग्लंडचा संघ ऍशेस मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. या दरम्यान 2 कसोटी सामने खेळले गेले. पण तिसर्या कसोटीपूर्वी एवढा मुसळधार पाऊस पडला की सामना सुरू करणे अशक्य झाले. तिसऱ्या कसोटीचे चार दिवस पावसात वाहून गेले. तर एक दिवस उरला. सामना न झाल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर दडपण होते ते नुकसान कसे भरून काढायचे? कारण सामना न झाल्याने प्रेक्षक आले नाहीत, त्यामुळे खूप आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या वनडेचे नियम काय होते?
पहिल्या वनडे सामन्यात दोन्ही संघांसाठी 40-40 षटके ठेवण्यात आली होती. एक षटक 8 चेंडूंची असेल असे ठरले. दोन्ही संघ प्रत्येकी एक डाव खेळतील. जो संघ सर्वाधिक धावा करेल त्याला विजेता घोषित केले जाईल. यादरम्यान गोलंदाजांसाठीही नियम बनवण्यात आले होते, सामन्यात कोणताही गोलंदाज 5 पेक्षा जास्त षटके टाकणार नाही, असे सांगण्यात आले. एकंदरीत, सामन्याचा निकाल कोणत्याही परिस्थितीत लागेल, अशा पद्धतीने नियम बनवले गेले. हा पहिला वनडे पाहण्यासाठी MCG येथे प्रचंड गर्दी जमली होती. आकडेवारीनुसार, 46,006 लोकांनी या सामन्याचा आनंद लुटला. या दरम्यान सुमारे 34 हजार डॉलर्स जमा झाले.