Shivrajyabhishek Din 2022 : आज शिवराज्याभिषेक दिन… रायगडावर लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी दाखल

WhatsApp Group

Shivrajyabhishek Din 2022 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आजच्या दिवशी म्हणजे ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला होता. रायगड (Raigad) किल्ल्यावर जवळपास ६ दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत हा राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishekh Sohla) चालला. याच दिनाचे निमित्त साधत शिवप्रेमी दरवर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करतात. आज (६ जून २०२२) ला रायगड जिल्ह्यातील रायगड गडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी लाखोच्या संख्येत शिवप्रेमी दाखल झाले आहेत. ढोल-ताशा आणि कुतारीच्या गजरात जल्लोष करण्यात येत आहे. ढोल-ताशाच्या गजरात भगवे झेंडे नाचवत शिवप्रेमी हा उत्सव साजरा करत आहेत.

कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा मात्र शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा होणार आहे. यंदा ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ आणि ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो शिवभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडवर येतात. पण गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त शिवभक्त येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.