
क्रिकेट (cricket) हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं उगाच म्हणत नाहीत. क्रिकेटमध्ये सहा चेंडूंवर सहा उत्तुंग षटकार लगावण्याची किमयाही केली जाते, तर एका ओव्हरमधील सहा चेंडूंवर सहा विकेट्सही घेण्याची संधी असते. त्यामुळे क्रिकेट या खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच काहीशी गत नेपाळ (Nepal Team) संघाची झाली. यूएईच्या संघाने अवघ्या ८ धावांवर अख्खा नेपाळचा क्रिकेट संघ गारद केला. एवढेच नाही तर, यूएईने (UAE) हे लक्ष्य अवघ्या सात चेंडूंत पार केले. क्रिकेट विश्वातला हा एक नवा विक्रमच म्हणता येईल.
टी-२० महिला अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या क्वालीफायर सामन्यामध्ये यूएई आणि नेपाळचा संघ आमनेसामने होता. यूएईची गोलंदाज महिका गौर हिने अवघ्या २ धावा देत पाच विकेट घेतल्या. तिच्या गोलंदाजीच्या तिखट माऱ्यासमोर नेपाळचा संघ ढेपाळला. नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. सहा फलंदाज तर शून्यावर बाद झाले.
विशेष म्हणजे नेपाळच्या सहा फलंदाजांनी शून्य धावा केल्या. तर स्नेहा महारा हिने सर्वाधिक तीन धावा केल्या. त्यासाठी ती १० चेंडू खेळली. नेपाळचा संघ ८ धावांवर गारद झाल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या यूएईच्या सलामीवीरांनी अवघ्या ७ चेंडूंत विजय मिळवला.