नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना त्याचे उद्घाटन करण्याची विनंती केली होती. पीएम मोदींनी 28 मे रोजी लॉन्चिंगला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संसदेला नवीन इमारत मिळणार आहे.
2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन संसद भवनाचे भूमिपूजन आणि पायाभरणी केली होती. सुमारे 971 कोटी रुपये खर्च करून ऑक्टोबर 2022 पर्यंत ते तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
नवीन संसद भवनाच्या लोकसभेत 888 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. सध्याच्या संसद भवनात लोकसभेतील कमाल 552 खासदारांची आसनव्यवस्था आहे. अशाप्रकारे आगामी काळात खासदारांची संख्या वाढेल तेव्हा कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर राज्यसभेचा आकारही मोठा असेल. 384 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. सध्याच्या राज्यसभेत 245 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.
नवीन संसद भवनात सेंट्रल हॉल नसेल. यामध्ये संसदेचे संयुक्त अधिवेशन आयोजित करता येईल अशा पद्धतीने लोकसभा सभागृहाची रचना करण्यात आली आहे. या सभागृहात 1272 जण बसू शकतील. सध्या जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये 436 लोकांची आसनक्षमता आहे. अशा स्थितीत संयुक्त अधिवेशनाच्या वेळी सुमारे दोनशे अतिरिक्त खुर्च्या बसवाव्या लागतात.