कर्नाटकातील हिजाबचा मुद्दा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हिजाब घालण्याच्या वादामुळे कर्नाटकात सुरू झालेला विरोध आता राज्यातील अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये पसरला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे चकमकीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
कर्नाटक उच्च न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी केलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय विचार करत आहे. त्याचवेळी वाढता वाद पाहता कर्नाटक सरकारने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
हिजाबचा वाद कधी सुरू झाला?
कर्नाटकात हिजाबबाबतचा वाद 1 जानेवारीपासून सुरू झाला होता. कर्नाटकातील उडुपीमध्ये हिजाब परिधान केल्यामुळे 6 मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयात वर्गात बसण्यास मज्जाव करण्यात आला. कॉलेज व्यवस्थापनाने नवीन गणवेश धोरण हे कारण सांगितले होते.
यानंतर या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुलींचा असा युक्तिवाद आहे की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.