BSF चे उंट बनले परेडचा भाग, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे नोंद! जाणून घ्या त्यांची खासियत
नवी दिल्ली – देशवासी आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करत आहेत. राजपथावर होणाऱ्या परेडच्या माध्यमातून भारत संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवत आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने उंटावर स्वार होऊन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होऊन उपस्थितांना रोमांचित केले. हे पथक पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग बनत आहे असे नाही, अनेक दशकांपासून सातत्याने या परेडचा ते भाग आहे.
गुजरात आणि राजस्थानमधील पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे जवान उंटावर स्वार होऊन सीमांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. जगातील अशा प्रकारचे हे एकमेव लष्करी पथक आहे, ज्यांच्या खांद्यावर देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. यामुळे त्याचे नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले गेले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या खांद्यावर देशाच्या ६,३८५ किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, ज्यामध्ये विस्तीर्ण वाळवंट, नदी-दऱ्या आणि मैलांपर्यंत पसरलेल्या बर्फाच्छादित प्रदेशांचा समावेश आहे.
The Camel-mounted band of the Border Security Force at the 73rd Republic Day at Rajpath pic.twitter.com/Lusl6VOUPT
— ANI (@ANI) January 26, 2022
१९७६ मध्ये पहिल्यांदा या पथकाचा समावेश करण्यात आला होता
राजपथावर सजवलेल्या उंटांवर बसलेले सीमा सुरक्षा दल पथक १९७६ मध्ये पहिल्यांदा सामील झाले. १९९० पासून सीमा सुरक्षा दलाचे बँड पथकही परेडचा भाग बनू लागले. उंटांना वाळवंटातील जहाज म्हणतात. वाळूच्या ढिगाऱ्यावर उंट सहज धावू शकतो. त्यामुळेच या जवानांसाठी उंटांची निवड करण्यात आली. अशा प्रकारच्या लष्करी तुकडीचं उदाहरण जगात कुठेही पाहायला मिळत नाही.