Maharashtra Cabinet Expansion: तारीख निश्चित, या दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

WhatsApp Group

Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार संध्याकाळी राजभवनात होणार आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आपलं सरकार चांगले काम करत असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली होती.

मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे.

त्याचवेळी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार एका महिन्यात झाला नसला तरी शिंदे सरकारने महिनाभरात 751 सरकारी आदेश जारी केले आहेत. यापैकी 100 हून अधिक आदेश एकट्या आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चार दिवसांत 182 सरकारी आदेश जारी केले होते.

सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. यात कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार हे ठरवण्यात आलं आहे.