
देशातील मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत देशात सातत्याने मुस्लिम विरोध वाढत चालला आहे. सुरुवातीला केवळ महानगरांमध्ये असणारी ही विरोधाची भावना आता छोट्या शहरांसहित अगदी गाव पातळीपर्यंत झिरपत प्रबळ होऊ लागली आहे. समाज म्हणून आपण जोपर्यंत मुस्लिम समाजाला बरोबरीचे स्थान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणार नाही व मुस्लिम समाजातील असुरक्षिततेची भावना दूर करणार नाही तोपर्यंत मुस्लिम समाज व इतर समाजामधील दरी दूर होणार नाही. देशाच्या एकूण लोकसंख्येत सुमारे २० टक्के असलेल्या मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहातून वगळून एकूण समाज म्हणून आपण यशस्वी होणार नाही. त्यामुळे देशाच्या सर्वसमावेशकतेला प्रमाण मानून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी बहुसंख्याक समाजाला पुढाकार घ्यावाच लागेल, अशी भूमिका मुस्लिम समाजाचे आकलन या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात्मक कार्यक्रमात मांडण्यात आली.
सध्या वाढत असलेल्या असहिष्णूतेच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचे नेमके वास्तव काय आहे? या समाजाला आजच्या परिस्थितीबद्दल काय म्हणायचे आहे? मुस्लिम समाजाबद्दल आपले आकलन काय असायला हवे? या अनुषंगाने गोरेगाव येथील केशव गोरे ट्रस्ट येथील मृणालताई गोरे दालनात झालेल्या कार्यक्रमात मुस्लिम प्रश्नांचे आकलन या विषयाची मांडणी सातारा हून आलेल्या मिनाज सय्यद आणि कुरुंदवाड येथून आलेल्या साहील कबीर यांनी केली. रविवारी दिवसभर झालेल्या या संवाद सभेत ८५ हून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पत्रकार, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, तरुण यांचा सहभाग होता.
मिनाज सय्यद म्हणाले, अशिक्षितपणा, बेरोजगारी, दारिद्र्य या केवळ मुस्लिम समाजाच्या नव्हे तर सर्व समाजाच्या समस्या आहेत. मुस्लिम समाजाची प्रमुख समस्या त्यांना वाटत असलेली असुरक्षितता आहे व ती समस्या दूर करण्याला सर्वात अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. मुस्लिम समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, ते सोडवण्याचा प्रयत्न करण्याआधी एकदा मुस्लिम समाजाच्या परिप्रेक्ष्यातून त्या समस्या समजून घेण्याची गरज आहे, असे मिनाज सय्यद म्हणाले. मद्रसा, तलाक, बहुपत्नीत्व, जास्त मुले या सर्व बाबींमध्ये सत्य परिस्थिती वेगळी असताना केवळ जाणिवपूर्वक वेगळी प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही परिस्थिती बदलणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
साहील कबीर म्हणाले, मुस्लिमांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघताना त्यांना काय भोगावे लागत असेल याचा कधीतरी विचार करण्याची गरज आहे. मुस्लिम शासकांनी तलवारीच्या जोरावर धर्म पसरवला असे बिनदिक्कतपणे पसरवले जाते. मुस्लिम समाजाला प्रत्येक बाबीमध्ये वेगळी वागणूक दिली जाते, त्यांच्याकडे नेहमी संशयाने पाहिले जाते, चळवळीत, मित्रपरिवारात नेहमी कार्यरत असलेली मुस्लिम व्यक्ती जेव्हा टोपी घालून समोर आली तर त्यांच्यावर धार्मिकतेचा शिक्का मारला जातो. चळवळीत काम करण्यासाठी मुस्लिम समाजाने नास्तिक असणे आवश्यक आहे का असा प्रश्न साहील यांनी उपस्थित केला. वर्षानुवर्षे मित्र, सहकारी असलेल्या मुस्लिमांबाबत कोणतीही बाब बोलताना, करताना ते मुस्लिम असल्याचे ठळकपणे का दाखवून दिले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एक दिवस डोक्यावर टोपी घालून व मुस्लिम समाजासारखे कपडे परिधान करुन फिरल्यास कशा नजरेने पाहिले जाते त्याचा अनुभव येईल, असे ते म्हणाले. देशात कोणतीही घटना घडल्यास, एखाद्या प्रकरणात मुस्लिम व्यक्तीला अटक झाल्यास सर्व मुस्लिम समाजाला दोषी असल्यासारखी वागणूक दिली जाते त्यामुळे समाजामध्ये इतरांबाबत अविश्वासाचे वातावरण वाढत असल्याचा मुद्दा साहील यांनी मांडला.
मुस्लिम समाजाच्या लोकसंख्या वाढीबाबत अवाजवी दावे केले जातात. प्रत्येक गोष्टीत मुस्लिम असल्याचे दाखवून दिले जाते ही परिस्थिती बदलल्याशिवाय विश्वासाचे वातावरण होणार नाही असे साहील म्हणाले.राज्य सरकारच्या माजी सह सचिव ऐनुल अत्तार यांनी मुस्लिम व अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा