डिसेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता!

WhatsApp Group

नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे. मोदी सरकार 15 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. दरम्यान, या योजनेत मोठे बदल करण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये अपात्र लोकांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. या योजनेचा गैरफायदा थांबवण्यासाठी सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता शिधापत्रिका आवश्यक करण्यात आली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, आणि तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचे असल्यास तुमचे रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवरील नोंदणीकृत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे. यासोबतच इतर आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी वेबसाइटवर अपलोड कराव्या लागणार आहेत. या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्र यांचा समावेश असणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असते. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 9 हप्ते  शेतकऱ्यांना जाहीर झाले असून 10 वा हप्ता 15 डिसेंबरला बॅंक खात्यात जमा होणार आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश लहान शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी खते, बियाणे इत्यादींसाठी आर्थिक सहाय्य करणे हा आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम वार्षिक 6000 रुपयांवरून 12000 रुपयांपर्यंत वाढवू शकते अशीही चर्चा सध्या आहे. असं झाल्यास गरीब शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.