मुस्लिम समाजाला लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी ठाकरे सरकार घेणार ‘भाईजान’ सलमान खानची मदत!

WhatsApp Group

महाराष्ट्र – राज्य सरकारच्या जनजागृती मोहिमेनंतरही, मुस्लिम भागात लसीकरण करणार्‍यांची संख्या वाढत नाही. यावर उपाय म्हणून आता राज्याच्या आरोग्य विभागाने ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खानची मदत घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेणार आहे.

राजेश टोपे म्हणाले, “मुस्लीसमाज भागात अजूनही काही संकोच आहे. मुस्लिम समाजाला लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी आम्ही सलमान खान आणि धार्मिक नेत्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. धार्मिक नेत्यांचा आणि चित्रपट कलाकारांचा खूप प्रभाव असतो आणि लोक त्यांचे ऐकतात.

‘लसीबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक’

राजेश टोपे म्हणाले की, लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे, मात्र काही भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंका निराधार आहेत. धार्मिक व्यक्तीला लसीची गरज नाही किंवा ही लस त्यांच्यासाठी फायदेशीर नाही असा विचार करणे ही अंधश्रद्धा आणि अज्ञान आहे. ते दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

राज्यात आजवर 10.25 कोटी लोकांच लसीकरण पूर्ण!

टोपे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत 10.25 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले असून नोव्हेंबर अखेरीस सर्व पात्र व्यक्तींना किमान पहिला डोस मिळेल. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबाबत टोपे म्हणाले की, तज्ज्ञांच्या मते साथीचे चक्र सात महिन्यांचे असले तरी मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे पुढील लाट तीव्र होणार नाही. ते म्हणाले की लोकांनी कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे आणि लसीकरण करावे.