मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. त्यामागचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे ते विधान ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत राज ठाकरेंना फोन करण्याची तयारी असल्याचे सांगितले. संधी मिळेल तेव्हा राज ठाकरेंशी बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
बीएमसीसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता दोन्ही भावांनी आता एकत्र यावे, अशी विनंती दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते वारंवार करत आहेत. मात्र, शिवसेना-मनसे युतीवर उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत, तर राज ठाकरे यांनी आपला पक्ष कोणाशीही युती करणार नसून एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कसमोरील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे.