मुंबई – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ७ हजार ८०० उमेदवारांकडून परीक्षार्थ्यांना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण घोषित झालेल्या १६ हजार ५९२ परीक्षार्थ्यांपैकी ७ हजार ८०० उमेदवार अनुत्तीर्ण असल्याचे आढळून आले आहे. या नापास परीक्षार्थ्यांना हेराफेरी करून उत्तीर्ण करण्यात आल्याच्या बातमीने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
२०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही अनुत्तीर्ण उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात पुणे सायबर पोलीस राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीची आणि परीक्षेच्या निकालाची कसून चौकशी करत आहेत. याच तपासादरम्यान सायबर पोलिसांना २०१९ -२० च्या परीक्षेच्या निकालाबाबतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ -२० परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ उमेदवार उत्तीर्ण झाले होते, मात्र परीक्षेच्या निकालाची सखोल छाननी केली असता सुमारे ७ हजार ८०० उमेदवार उत्तीर्ण झाले नसल्याचे दिसून आले. पण त्यांना उत्तीर्ण दाखवण्यात आलं आहे.
शिक्षण परिषदेने आता २०१३ पासूनच टीईटीद्वारे होणाऱ्या भरतीतील शिक्षकांची प्रमाणपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासावे, असा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना, महापालिकांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळांना देण्यात आले आहेत. पुणे सायबर पोलीस सध्या २०१८ आणि २०२० मधील TET घोटाळ्याचा तपास करत आहेत.