पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 10 डबे रुळावरून घसरले, 15 ठार, 50 जखमी

0
WhatsApp Group

पाकिस्तानमधील शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान रविवारी (6 ऑगस्ट) एक भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात हजारा एक्स्प्रेसच्या सुमारे 10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकूण 15 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जण जखमी झाले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेन कराचीहून पंजाबला जात असताना अपघात झाला.

पाकिस्तान रेडिओच्या वृत्तानुसार, नवाबशाहमधील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी हजारा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरून 15 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. अहवालानुसार मृतांचा आकडा अजून वाढू शकतो.

वृत्तानुसार, जखमींना उपचारासाठी नवाबशाह येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डॉन न्यूज टीव्हीच्या रिपोर्टनुसार, ट्रेन कराचीहून रावळपिंडीला जात होती.

मदत आणि बचाव कार्य सुरू आहे

लाहोरमध्ये माध्यमांशी बोलताना रेल्वे आणि विमान वाहतूक मंत्री ख्वाजा साद रफिक म्हणाले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ते म्हणाले की, 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अपघात अत्यंत दुःखद आहे. सध्या नुकसानग्रस्तांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर या घटनेची चौकशी केली जाईल.

दरम्यान, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी नवाबशहाच्या उपायुक्तांना जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दशकात पाकिस्तानमध्ये अनेक मोठे रेल्वे अपघात झाले आहेत.