नागपूर: नागपुरातील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 9 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर प्लांटमध्ये गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
नागपुरातील एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेतील मृत्यूंबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करून वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.