उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता नाही येणार; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेतच यावे लागणार

WhatsApp Group

पुणे – दहावी-बारावीच्या परीक्षेस दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा परीक्षा केंद्रावर येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आशय आढळून येत असल्यामुळे परीक्षेस उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.

परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर उशिरा येणाऱ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नाही.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेसाठी दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा येणा-या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून कार्यपद्धत ठरवण्यात आली होती. त्यानुसार वेळेनंतर दहा मिनिटे उशीरा येणा-या विद्यार्थ्यांची केंद्र स्तरावर चौकशी करून त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जात होती.

तसेच वीस मिनिटांनंतर परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्याला विभागीय मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिवांच्या परवानगी परीक्षेसाठी प्रवेश दिला जात होते. परंतु,राज्यात काही ठिकाणी परीक्षेला उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय असल्याचं अढळून आलं. त्यामुळे राज्य मंडळाने कठोर पावले उचलत परीक्षेला उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे, असं राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

सर्व शाळांना महत्त्वाच्या सूचना …

  • विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
  • विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी दहा मिनिटे आधी वर्गात उपस्थित असणे गरजेचे असणार आहे.
  • परीक्षा सुरू झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये.
  • परीक्षा कक्षात मोबाईल किंवा तत्सम साधने वापरता येणार नाहीत.
  • काही अपरिहार्य कारणामुळे सकाळच्या सत्रात साडेदहा वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात तीन वाजेपर्यंत विद्यार्थी उशीरा आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्याची तपासणी करून विभागीय मंडळाच्या परवानगीने त्याला परीक्षेला बसू द्यावे.