टेनिस बॉल क्रिकेट आणि कोकण, एक अतुट नातं!

WhatsApp Group

आपल्या भारतात क्रिकेटप्रेमींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील जास्ती जास्त लोक हे आपल्याला क्रिकेट खेळणारेच मिळतील. भारतात क्रिकेट या खेळाने प्रत्येकाच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. 16 व्या शतकात इंग्रजांनी सुरू केलेला हा खेळ आज आपल्याला प्रत्येक गावात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारताचा विचार करायचा तर लेदर बॉल क्रिकेट खेळणारे तुम्हाला कमीच मिळतील. मात्र टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे युवक तुम्हाला भारतातील प्रत्येक भागात प्रत्येक गावात मिळतील. तू कोणता खेळ खेळतोस? असा प्रश्न एखाद्या लहान मुलाला विचारल्यावर आपल्याला साहजिकच उत्तर मिळतं ते म्हणजे क्रिकेट.

टेनिस बॉल क्रिकेटचं वेड भारतात लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांमध्येही दिसून येतं. टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी साहित्यही कमी लागतं एक बॉल आणि एक बॅट, स्टंप म्हणून भारतातील लोक काहीही उभं करतात. टायरपासून ते खुर्चीपासून अगदी काहीही…

खेड्यांमधील हौशी तरुण क्रिकेट खेळण्यासाठी शेतजमिनीच्या जागेत मैदान करून त्या जागेत क्रिकेटचा आंनद घेतात. तर मुंबई-पुणे या शहरातील मूलं खेळण्यासाठी मैदान नसल्यास गल्ल्यांमध्ये जागा तयार करून क्रिकेटचा आनंद घेतात. खेळासाठी जागा नसल्यास कुठे मिळेल त्या जागेत खेळेल तो खरा क्रिकेटप्रेमी.

कोकण पट्यात टेनिस क्रिकेटचं वेड प्रंचड आहे. म्हणजे आंबा आणि काजू जेवढं कोकणातल्या लोकांना प्रिय आहे तेवढंच टेनिस क्रिकेट. तळकोकणातील प्रत्येक गावात जत्रोत्सवानिम्मीत्त क्रिकेटचे सामने हमखास ठेवले जातात. गावी क्रिकेटचे सामने ठेवल्यास काहीजण तर कामावर रजा देत या खेळाचा आनंद घेण्यासाठी शहरातून गावी येतात. या खेळाने प्रत्येक कोकणवासीयांच्या मनात एक उत्साहाची भावना निर्माण केली आहे. तळकोकणातील अनेक गावांमध्ये वार्षिक जत्रोत्सोवाच्या दिवशी हे टेनिस क्रिकेटचे सामने भरवलेच जातात. दिवसभर क्रिकेट खेळून रात्री मस्त तयार होऊन देवळात जत्रेला जायचं असा हा दरवर्षीचा कार्यक्रम असतो.

सिंधुदुर्गात प्रत्येत गावात दरवर्षी जत्रा असतेच आणि त्या दिवशी गावात टेनिस क्रिकेटची स्पर्धा ही १०० टक्के भरतेच. दिवाळी संपली की कोकणात जत्रा आणि टेनिस क्रिकेटचे सामने हे समिकरण पक्कं झालेलं असतं. त्यामुळे नोव्हेंबरपासून पुढे 4-5 महिने दर दिवशी कुठे ना कुठे या स्पर्धा चालूच असतात. या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमधूनच ‘गोट्या अंपायर’ महाराष्ट्रात खूप फेमस झाला होता.

या सामन्यांमध्ये खरा रंग भरतो तो मालवणी समालोचक, आपल्या हटके स्टाईलने समालोचन करत दिवसभर जमा झालेल्या खेळाडूंचे हा समालोचक मनोरंजन करत असतो. विशेष म्हणजे हे समालोचन मैदानाच्या चारही बाजूने मोठं मोठे स्पिकर्स लाऊन केलं जातं. त्यामुळे ज्या गावात हे सामने असतील त्या गावात दिवसभर या समालोचकांचाच अवाज घुमत असतो.

आता तर काही हौशी मडंळी राजकीय नेत्यांच्या मदतीने एकत्र येत मोठ-मोठे टेनिस क्रिकेटचे सामने भरवतात. आणि हे सामने पावसाळा वगळता बाकी सर्व महिन्यांमध्ये खेळले जातात. या अशा स्पर्धांमधून अनेक युवा खेळाडूंनी नावलौकीकही मिळवलं आहे.

टेनिस क्रिकेटमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृष्णा सातपुते, उस्मान पटेल, अंकुर सिंह हे आजच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वात प्रसिद्ध नावं आहेत. आता तर टेनिसचे सामने आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळले जातात, मागे एकदा असाच एक सामना भारत आणि पाकिस्तान टेनिस संघात झाला होता. या सामन्यात अंकुर सिंहच्या नेतृत्वात भारताने मोठा विजय मिळवला होता. अंकुर सिंह टेनिस क्रिकेटसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनची टी-20 मुंबई लीगही खेळला आहे.

टेनिस क्रिकेट फक्त आपल्या भारतात नव्हे तर UAE सारख्या मोठ्या देशांमध्ये देखील खेळलं जात आहे. दुबईमध्ये टेनिस क्रिकेटच्या मोठ्या लीगदेखील खेळल्या जातात.