Father’s Day 2022: वडिलांच्या निधनानंतरही सचिन-विराटने सोडलं नव्हतं मैदान

WhatsApp Group

Father’s Day Special: जगभरात आज म्हणजेच 19 जून रोजी फादर्स डे साजरा केला जात आहे. फादर्स डे (Father’s Day 2022) दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. सर्वात प्रथम 1910 मध्ये फादर्स डे साजरा करण्यात आला. दरम्यान, आज क्रीडा जगतातील दिग्गजांनीही फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांना आदरांजली वाहिली. त्यापैकी काहींच्या वडिलांना जग सोडले असून आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या वडिलांचे 2006 मध्ये निधन झाले. त्यावेळी विराट कोहली अवघ्या 18 वर्षाचा होता. आपल्या वडिलांच्या निधनानंतर विराटने देशासाठी खेळण्याचं आपल्या कुटुंबाला वचन दिलं. कारण विराटने देशासाठी क्रिकेट खेळावं हे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, असं विराट कोहलीनं एका मुलाखातीदरम्यान सांगितलं होतं.विराटच्या वडिलांचे डिसेंबर 2006 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं, हे त्याच्या आयुष्यातील ‘सर्वात प्रभावी’ क्षण होता. त्या दिवसांत कोहली दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळत होता. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोहली दुसऱ्या दिवशी वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरला होता.

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानेखूप मेहनत आणि समर्पण दाखवलं. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांना वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनीच मैदानावर खेळायला आला होता. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं 1999 साली निधन झालं आणि त्यावेळी तो इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळत होता. या स्पर्धेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला त्याच्या वडिलांबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर तो लगेच भारतात परतला. त्यानंतर तो पुन्हा विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला आणि तेथे पोहोचल्यानंतर त्याने केनियाविरुद्ध शतक झळकावून भारताला विजय मिळवून देत आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. कारण, सचिन तेंडुलकरने भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं.