Virat Kohli Injured: टीम इंडियाला मोठा धक्का; विराट पहिल्याच वनडेतून होऊ शकतो बाहेर

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज (१२ जुलै) रोजी ओव्हल मैदानात खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे आणि तो म्हणजे माजी कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे सराव सत्रात भाग घेऊ शकला नाही, त्यामुळे ‘किंग कोहली’ कदाचित पहिल्याच वनडे सामन्यामधून बाहेर पडू शकतो.

रविवारी तिसर्‍या टी-२० सामन्यात विराटच्या मांडीला दुखापत झाली. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “गेल्या सामन्यात विराटच्या मांडीला दुखापत झाली होती. हे क्षेत्ररक्षणादरम्यान किंवा फलंदाजी करताना झाले की नाही हे समजू शकले नाही. ओव्हल येथे होणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याला तो कदाचित मुकेल कारण मांडीला विश्रांतीची गरज आहे.” याशिवाय कोहली टीम बसने नॉटिंगहॅमहून लंडनला आला नसल्याचे समजले आहे. यामागे वैद्यकीय तपासणी हे कारण असू शकते.

लंडनच्या केन्सिंग्टन ओव्हल येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सोमवारी विराट वैकल्पिक सरावासाठी आला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, त्याच्या मांडीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिला एकदिवसीय सामना खेळण्याची शक्यता नाही. सूत्राने पुढे सांगितले की, वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आणि असे आढळून आले की विराटला सौम्य स्ट्रेन आहे.

एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत सामन्यात विराट कोहली अनुक्रमे ११ आणि २० धावा करू शकला आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याची खराब कामगिरी सुरूच राहिली, जिथे तो दोन डावात केवळ १२ धावाच करू शकला. तसेच, कोहलीसाठी आयपीएल २०२२ देखील खास राहिला नाही, ज्यामध्ये तो १६ सामन्यात २२.७३ च्या सरासरीने आणि ११५.९८ च्या स्ट्राइक रेटने केवळ ३४१ धावा करू शकला. यादरम्यान तो केवळ दोनच अर्धशतकेच करू शकला.