कोलकाता : रोहित शर्माने Rohit Sharma कर्णधारपदाची सूत्रे हाती घेताच भारतीय क्रिकेट संघाचे चेहराच बदलला आहे. टीम इंडियाने रविवारी ३ सामन्यांच्या मालिकेतील खेळल्या गेलेल्या अखेरच्या टी२० सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने ३ सामन्यांची ही टी२० मालिका ३-० ने जिंकत वेस्ट इंडिजला ‘क्लीन स्वीप’ दिला आहे.
रविवारी वेस्ट इंडिजच्या संघाला भारताने विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले होते. भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ९ विकेट्स गमावत १६७ धावा करू शकला. वेस्ट इंडिजला विजयासाठी शेवटच्या १२ चेंडूत ३१ धावा करायच्या होत्या. मात्र हर्षल पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनी शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला १६७ धावांवरत रोखले.
टीम इंडिया टी-२० मध्ये बनली नंबर वन – ३-० च्या मोठ्या फरकाने मालिका जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० क्रमवारीत जगातील T२०I rankings नंबर वन संघ बनला आहे. सहा वर्षांत भारत प्रथमच टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. भारत आणि इंग्लंडनंतर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. रँकिंगची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. पण रोहितने टीम इंडियाची धुरा सांभाळताच भारताला छोट्या फॉरमॅटमध्ये अव्वल स्थानावर नेण्यात यश मिळवलं आहे.