68 वर्षानंतर पुन्हा एकदा एयर इंडियाची मालकी टाटांच्या हाती!

WhatsApp Group

नवी दिल्ली – तोट्यात असलेल्या ‘एयर इंडिया’ (air india) च्या खरेदीसाठी टाटांची (Tata Sons) बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता एयर इंडिया कंपनीचा मालकी हक्क सात दशकानंतर मूळ मालकाच्या ताब्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली एता टीमने ‘टाटा’ च्या बोलीला मंजूरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

एयर इंडियाच्या खरेदीसाठी सरकारकडे 4 वेगवेगळ्या निवीदा आल्या होत्या. यात टाटा सन्स ची बोली सर्वाधिक आघाडीवर होती. स्पाइसजेट चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी देखील खरेदीसाठी निविदा दाखल केली होती. मात्र टाटाने सर्वोत्तम बोली लावलत एयर इंडियाची मालकी हक्क मिळवला. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाला मिळाल्यानंतर रतन टाटा (ratan tata) यांनी  ‘वेलकम बॅक, एअर इंडिया’ असं एक ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे.

एयर इंडियाची मालकी टाटांकडे जाणार असल्याने त्यांनीच स्थापन केलेल्या एअर इंडिया कंपनीचा मालकी हक्क तब्बल 68 वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांना मिळणार आहे. 1932 साली जेआरडी टाटा यांनी ‘टाटा एयरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे 1946 मध्ये ‘एयर इंडिया’ असे नामकरण करण्यात आले होते.

तोट्यात असलेल्या या कंपनीसाठी टाटा समूहाने सर्वात जास्त बोली लावत मालकी हक्क मिळवला. एयर इंडियावर एकूण थकीत कर्ज 60,074 कोटी रुपये एवढा आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या 146 विमाने आहेत.