सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा थरार: अखेरच्या चेंडूत ५ धावा हव्या असताना शाहरूखने ठोकला षटकार…

WhatsApp Group

दिल्ली – तमिळनाडूने सलग दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सोमवारी दिल्लीत खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात शाहरूख खानने संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजयी केले. शाहरूखने 15 चेंडूत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद 33 धावा केल्या.

शेवटची थरारक ओव्हर

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकातं तामिळनाडूला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर साई किशोरने दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतला. यानंतर प्रतीक जैनने पुढचा चेंडू वाईड फेकला. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर फलंदाजांनी प्रत्येकी एक धाव घेतली. प्रतीक जैनने पुन्हा एकदा वाईड बॉल टाकला. अशा स्थितीत आता तामिळनाडूला दोन चेंडूत सात धावा करायच्या होत्या. शाहरुख खानने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना शाहरुख खानने खणखणीत षटकार मारून तामिळनाडूला विजय मिळवून दिला. शाहरुखच्या या दमदार फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.


कर्नाटकने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूचा सलामीवीर हरी निशांतने चांगली सुरुवात केली. निशांतने 12 चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. दुसरा सलामीवीर एन. जगदीसननेही 41 धावा केल्या. त्यानंतर 95 धावांवर निशांत आणि कर्णधार विजय शंकर बाद झाल्यानंतर तामिळनाडूचा डाव डगमगला. 116 धावा असताना संजय यादव बाद झाला त्यामुळे तामिळनाडूचा विजय अवघड वाटत होता, मात्र शाहरुख खानने संघाला विजय मिळवून दिला.


प्रथम फलंदाजी कराताना कर्नाटकने केल्या 151 धावा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने 20 षटकांत 7 बाद 151 धावा केल्या. कर्नाटकसाठी अभिनव मनोहरने 46 आणि प्रवीण दुबेने 33 धावांचे योगदान दिले. मनीष पांडे 13 धावा तर करुण नायरने 18 धावा केल्या, या दोन्ही स्टार फलंदाजांना आज आपल्या नावाला साजेल अशी कामगिरी करता आली नाही. तामिळनाडूकडून साई किशोरने शानदार गोलंदाजी करत सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा देत ही कामगिरी केली.

तामिळनाडूचे तिसरे विजेतेपद

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील तामिळनाडूचे हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले आहे. तमिळनाडूच्या संघाने यापूर्वी 2006/07 आणि 2020/21 विजेतेपद मिळवले होते. गेल्या वर्षी तामिळनाडूचा संघ बडोद्याला पराभूत करून चॅम्पियन ठरला होता. तसेच सर्वाधिक वेळा ( 3 वेळा) या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा विक्रमही तमिळनाडूच्या नावावर झाला आहे.