धडगांवमधील महिलेस अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा लोकसंघर्ष मोर्चाचा आंदोलनचा इशारा

पोलीस यंत्रणा ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असते मात्र हेच पोलीस जर गुंडांसारखी अमानुष मारहाण करत सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत असतील तर अश्या पोलिसयंत्रणेतील मुजोर कर्मचारी व अधिकारी यांना सनदशीर मार्गाने वठणीवर आणण्याचे काम जनतेलाच करावे लागेल का असा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यात धडगांव तालुक्यातील पोलिसांच्या दडपशाही मुळे निर्माण झाला आहे एकीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस हे नेहमीच गुन्हेगारांच्या विरोधात उभे रहातात व लोकाभिमुख कार्यपद्धती राबवितात ही त्यांची ख्याती असतांना, मात्र तरीही पोलिसांच्या या कारकिर्दीला काही मुजोर पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतःच कायदा हातात घेऊन गालबोट लावत असतील तर ही बाब चिंतेची आहे.
धडगांव तालुक्यात आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी तो आरोपी मिळाला नाही म्हणून त्याचा पत्नीला ती सिकलसेल सारख्या गंभीर व्याधीने आजारी असतांनाही व सोबत लेडीज पोलीस कॉन्स्टेबल नसतांना तिच्यावर दबाव टाकून तिची चौकशी करतात आणि तिला अमानुष मारहाण करतात ही प्रवृत्ती भयंकर आहे.
मुळात धडगांव तालुका हा पुर्णतः पेसा कायद्याखालील 5 वी अनुसूची लागू असलेला तालुका आहे. अश्या क्षेत्रात पोलीस पेसा गावात जातांना तेथील गावातील पोलीस पाटील किंवा इतर गांवप्रमुखांना काहीही न कळवता परस्पर चौकशी कसे करू शकतात.
पेसा कायदा हा पोलिसांना गावात जाऊन अशी मारहाण करण्याची मुभा देतो का? – लोकसंघर्ष मोर्चा या घटनेचा तीव्र धिक्कार करत असून दोषी असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल केले जावेत व त्यांच्यावर केवळ प्रशासकीय कारवाई न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चा करीत आहे तसेच राज्यपाल यांच्या कडेही तक्रार दाखल करण्यात येणार असून जिल्हा पोलिस प्रमुखांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू याची ही नोंद घ्यावी