
नवी दिल्ली – आग्रा येथील ताजमहालावर जयपूरच्या माजी राजघराण्याने आपला दावा सांगितला आहे. जयपूरच्या माजी राजघराण्याच्या प्रिंसेस आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी यांनी ताहमहाल ही आपली प्रॉपर्टी आहे. तो आमच्या कुटुंबाच्या पॅलेसच्या मालमत्तेवर उभा आहे. आमच्याकडे अशी कागदपत्रे देखील आहेत, जी ताजमहाल हा जयपुरच्या माजी राजघराण्याचा एक पॅलेस होता, याला दुजोरा देतात. या पॅलेसवर पुढे शाहजहानने कब्जा केला असं त्या म्हणाल्या आहेत.
दीया कुमारी यांनी सांगितले की, जेव्हा शाहजहानने जयपूर राजघराण्याचा तो पॅलेज आणि जमीन घेतली होती. त्यावेळी मुघलांचे राज्य होते. त्यामुळे त्यांना विरोध करणे शक्य नव्हते. आजसुद्धा कुठलेही सरकार कुठलीही जमीन अधिग्रहित करते तेव्हा त्याच्या बदल्यात नुकसान भरपाई दिली जाते. मात्र त्यावेळी असा कुठला कायदा केला नव्हता. त्यामुळे त्याबाबत दाद मागणे शक्य नव्हते. आता कुणीतरी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे.
त्या पुढे म्हणाल्या, बंद खोल्या उघडून ताजमहाल हा आधी काय होता, याचा शोध घेतला गेला पाहिजे. ताज महाल तोडला पाहिजे, असं मी म्हणणार नाही. मात्र त्याच्या काही खोल्या उघडल्या पाहिजेत. त्यांनी सांगितले की, ताजमहालामधील काही खोल्या बंद आहेत. काही भाग दीर्घकाळापासून बंदच आहेत. त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे, तसेच ते उघडले पाहिजेत. त्यामुळे तिथे काय होते काय नव्हते हे सर्वांना समजेल. या सर्व दाव्यांची योग्य चौकशी झाल्यावरच याबाबतची निश्चित माहिती समोर येईल, असंही त्या म्हणाल्या.