T20 World Cup: आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली रचणार इतिहास, नेमकं काय ते वाचा

WhatsApp Group

भारतीय फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विश्वविक्रमाकडे डोळे लावून बसेल. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि अशा परिस्थितीत त्याला इतिहास रचण्याची प्रत्येक संधी आहे. तो टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यापासून फक्त 28 धावा दूर आहे.

रविवार, 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 28 धावा केल्या तर तो टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. त्याने 11 धावा केल्या तरी या मेगा स्पर्धेच्या इतिहासात 1000 धावा करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरेल. त्याच्या पुढे श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आहे.

महेला जयवर्धनेने 31 सामन्यांमध्ये 1016 धावा केल्या आहेत, तर विराट कोहलीने आतापर्यंत 23 सामन्यांच्या 21 डावांमध्ये 989 धावा केल्या आहेत. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतक (12) ठोकणारा विराट कोहली आधीच जगातील पहिला फलंदाज आहे.

विराटने ही कामगिरी करताच त्याला मागे सोडणे कोणत्याही फलंदाजाला कठीण जाईल, कारण त्याच्यानंतरचे सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. मात्र, रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे, जो सध्या टी-20 विश्वचषक खेळत आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात त्याने आतापर्यंत 904 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरचाही या यादीत समावेश असून तो 778 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

भारताला पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या विजयानंतर उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेनेही शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवून अव्वल चारमध्ये स्थान मिळवले आहे. भारताला हरवल्यास उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित होऊ शकते.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर-12 मधील सामना रविवारी 30 ऑक्टोबर रोजी पर्थ क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 4.30 वा. सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईलसामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो, ट्रिस्टन स्टब्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नोरखिया, तबरीझ शम्सी.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.