T20 World Cup 2022: टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध, जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार सामना

WhatsApp Group

Ind vs Ban: टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सध्या टीम इंडिया ग्रुप-2 च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे पण सेमीफायनलचे तिकीट निश्चित करण्यासाठी त्यांना सुपर-12 फेरीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. टीम इंडियाचा सामना आता बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे.

टीम इंडिया आता पुढच्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे. हा सामना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. अॅडलेड ओव्हलवर होणारा हा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. या सामन्यात विजेत्या संघाचा उपांत्य फेरीचा दावाही मजबूत असेल.

बांगलादेशने 2022 च्या T20 विश्वचषकातील तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. हे दोन्ही विजय लहान संघांविरुद्ध असले तरी. बांगलादेशने नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेला जवळच्या सामन्यात पराभूत करून विजयाची नोंद केली. याशिवाय त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 104 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.

टीम इंडियाचा वरचष्मा

या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा स्पष्ट दिसत आहे. बांगलादेश संघाने यावर्षी काही टी-20 सामने जिंकले आहेत, याउलट भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांना टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. या वर्षी भारताने श्रीलंका आणि विंडीजलाही टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. टीम इंडियाही चांगल्या लयीत दिसत आहे. दुसरीकडे बांगलादेशचा संघ फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंतही संघर्ष करताना दिसत आहे.

भारत-बांगलादेशचा हा महत्त्वाचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित होणार आहे. डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.